राज्यात आजही गारपीट सह अवकाळी पाऊस,सोबत उष्णतेच्या लाटेचाही इशारा, कशी असणार तुमच्या भागातील स्थिती?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे वादळी वारा आणि अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खडकी बोरगाव, मोय खेडा दिगर, फतेपूर् फेक्री या गावांना मंगळवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले.
बुलडाणा, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस ३० – ४० kmph वेगाने येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २२°C च्या आसपास असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, म्हणून मुंबईकरांना मात्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. पुणे आणि कोल्हापुरात उन्हाची तीव्रता कायम आहे. पुण्यात ९ एप्रिल रोजी तापमान ४० अंशांच्या घरात राहीलं. १० एप्रिल रोजी वातावरण काहीसं ढगाळ राहणार असल्याने तापमानात एक अंशांची घट होऊ शकते. त्यानंतर ११ आणि १२ एप्रिल रोजी पुण्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील तापमानात फारसा फरक झालेला नाही. नाशिकमध्ये ९ एप्रिल रोजी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. १० एप्रिलला हीच स्थिती कायम असणार आहे. पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा