सेना-भाजप एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये!, भाजप नेत्याचं मोठं विधान
Monday To Monday NewsNetwork।
नागपूर(वृत्तसंस्था)। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप सोबत पुन्हा जूळवून घ्या अशी मागणी सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावरुन पुन्हा सेना – भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. आता आणखी एका भाजप नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोटच केलाय. त्यामुळे, येणाऱ्या काळात भाजप-सेना एकत्र येणार का हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नेमके काय म्हणाले? प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या पत्रात काय?
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
तुटण्याआधी जुळवून घेतलेलं बरं पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.