मोठी बातमी : कोट्ट्यावधी रुपयांचा ड्रॅग साठा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातून गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज साठा जप्त करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ किलो ९३७ ग्रॅम ड्रग्ज जप्त केला आहे. ज्याची किंमत ८ कोटी ८१ लाख रुपये आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र विमानतळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तस्कराला ताब्यात घेतलं. अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी तामिळनाडू राज्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ४५ वर्षीय व्यक्ती युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र QR-590 ने पहाटे नागपूर विमानतळावर आला होता. ड्रग्स तस्करीबाबत आधीच माहिती मिळालेली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानतळावर बंदोबस्त लावला होता. यावेळी ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ग्रीन चॅनलवरून जात असताना त्याला अडवण्यात आले. अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय असल्याने त्याची झडती घेण्यात आली. यावेळी कस्टमच्या अधिकाऱ्यांना आरोपीकडून तब्बल २ किलो ९३७ ग्रॅम ड्रग्जचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ८ कोटी ८१ लाख रुपये आहे. कस्टम अधिकारी पुढील तपास करत आहेत.