माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची छापेमारी !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नागपूर, वृत्तसंस्था : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.