कोळश्याच्या प्रचंड टंचाईने विजेचं संकट वाढलं ; काय म्हणाले नितीन गडकरी
नागपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात कोळश्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेचं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या कोळशात दगडही पाठविले जातात. नाशिक-कोराडीतील औष्णिक वीज प्रकल्पात कोळशातून आलेले दगडाचे ढीग पाहायला मिळतात याकडे लक्ष वेधतानाच ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत.
त्या कोळसा खाणी सुरु करण्यासाठी खासगीकरणाचा वापर करून पाहावा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे. कोळशाचे अधिक उत्पादन वाढविणे आता आवश्यक झाले आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. यापूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, असे मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
नागपुरात वेस्टर्न कोल फिल्डसच्या सीएसआर फंडातून दिव्यांग लोकांना विविध साहित्याच वाटप करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना नितीन गडकरी यांनी हा सल्ला दिला. कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्सने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच आज गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे. शासनाने कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेस्टर्न कोल फ्लिड्सने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळता येईल व सिलेंडरचे दर स्वस्त होईल, असे गडकरी म्हणाले