हिवाळी अधिवेशन : 2 डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य,प्रेक्षकांना व आमदारांच्या PA ला नो एन्ट्री!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नागपूर,वृत्तसंस्था। महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात आली आहे. मुंबईत पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने काल नागपुरात पार पडलेल्या विधीमंडळ समितीच्या बैठकीत सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला.
विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही
यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.
डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य
याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली.
एक आसन सोडून सदस्यांना बसणं अनिवार्य, प्रेक्षकांना नो एन्ट्री
कोरोना पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी प्रेक्षकांना कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
अंतिम निर्णय राज्य सरकार घेईन
नागपुरात हिवाळी अधिवेशनासंदर्भात सुरु असलेली तयारी समाधानकारक आहे. आमदार निवास कोव्हिड केअर केंटर करण्यात आला होता. ती इमारत सुद्धा सॅनिटाईज करुन अधिवेशनासाठी तयार केली जाईल. यासंदर्भात अंतिम निर्णय मात्र संसदीय कामकाज समितीच्या बैठकीतच घेतला जाईल.