आघाडीत बिघाडी : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय, नाना पटोलेंचा हल्लाबोल
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले असून त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसल्यची टीका करत याचा जाब विचारणार असल्याचे म्हणत हल्ला चढवला आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून अनेक वाद होऊन देखील अद्याप शाबूत असलेल्या महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत. नुकताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचं काम केल्याचा आरोप केला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक. या निवडणुकीत पटोले विरुद्ध पटेल अर्थात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केलं असून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.
भंडारा आणि गोंदिया येथील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच एकमत होऊ शकलं नाही. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजप बरोबर हाथमिळवणी केली. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या (नाना पटोले ) भंडारा जिल्ह्यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानं नाना पटोले यांनीही भाजप फोडली. चरण वाघमारे गटाने साथ दिल्याने काँग्रेसने आपला अध्यक्ष बसवला. तर उपाध्यक्ष पद चरण वाघमारे गटाकडे गेले आहे.
माजी आमदार चरण वाघमारे यांच्या भाजप गटाने भंडारा जिल्ह्यात कॉग्रेसला सात दिल्यानं चरण वाघमारे यांची ६ वर्षा करिता भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. या सगळ्या राजकीय खेळीनंतर नाना पटोले म्हणाले, ‘भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. आम्ही जयंत पाटील व प्रफुल पटेल यांच्या बोलल्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली.’
‘गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला,’ असं विधान नाना पटोलेंनी केलं आहे. गोंदियातही राष्ट्रवादीने काँग्रेसला दूर ठेवत भाजपला साथ दिली. भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला आहे. महाविकास आघाडीत येथे बिघाडी झाली आहे.