मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज, नाशिक मध्ये भाजप आक्रमक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक आणि जामीन प्रकरणानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. राज्यात यवतमाळनंतर आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी हे तक्रार अर्ज पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाण्यात हे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन तक्रार अर्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तर एक तक्रार अर्ज सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचं कौतुक केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तर सामना अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करुन नाशिकमध्ये पोस्टर झळकावल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलीय. यात आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
भाजपची तक्रार, पण कायदा काय सांगतो?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार होऊ शकत नाही. तक्रार दाखल करुन घेताना कायदेशीर अडचणी येऊ शकतात. कायद्यानुसार एखादी घटना घडली तर लगेच तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. मात्र याला तीन वर्षे उलटून गेलीत त्यामुळे काय वाद निर्माण झाला असं वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर कारवाई होऊ शकत नाही, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची…