वृद्धांच्या एटीएम कार्डमधून चोरट्याने केली ६८ हजाराची फसवणूक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील द्वारका परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम बूथमध्ये एका अनोळखी इसमाने वृद्धाकडील एटीएम कार्ड लबाडीने ताब्यात घेतले. दरम्यान, ६८ हजार ९६७ रुपयांची काही ऑनलाईन खरेदी केली. तसेच उर्वरित रक्कम काढून घेतली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हबीब बेग मोगल बेग मिर्झा (वय ६९) हे ड्रीमपार्क जलसा हॉलजवळ, अशोका मार्ग परिसरात राहतात. गुरुवारी (दि.३१ डिसेंबर) रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास एटीएम बुथमध्ये एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांचे एटीएम कार्ड पैसे काढून देण्याच्या बहाण्याने मागितले. दरम्यान, पैसे निघत नाही असे सांगत, फिर्यादीचे कार्ड लबाडीने स्वतः जवळ ठेवून घेतले. तसेच मिर्झा यांना त्याच्याजवळ असलेले निंबा शिंपी नावाचे बंद एटीएम कार्ड दिले. त्यानंतर, संशयिताने फिर्यादीच्या खात्यावरून, २९ हजार ३८ रुपये काढून घेतले. तसेच ३९ हजार ९२९ रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. असे एकूण ६८ हजार ९६७ रुपयांची फसवणूक झाली.