राज्यात कुठल्याही क्षणी आणीबाणी लागू होईल,”या” नेत्याच खडबड जनक वक्तव्य
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून, कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासाळली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आणीबाणी लागू होईल, अशी परिस्थिती आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्र्कांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
मात्र, असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीवादी असल्याने असे होणार नाही, अशी टिप्पणी जोडतानाच त्यांनी इंदिरा गांधींच्या सत्ताकाळात १९ वेळा आणीबाणी लागल्याची आठवण करून दिली. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय तसेच विविध उद्घाटनांच्या कार्यक्रमांसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते.
यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने कामगार, मजुरांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. सरकार त्यांच्याशी चर्चा करत नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगतानाच, या सर्व परिस्थितीचा विचार करता आणीबाणी लागू होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.