Breaking News:मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा,नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता भोवण्यची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत अटक करण्यासाठी पोलिसांची टीम तयार आहे. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, तपास अधिकारी आनंदा वाघ यांच्या अध्यक्षतेत टीम कारवाई करणार आहे.