आयकर विभागाचे धाड सत्र : २४० कोटींचे घबाड सापडले, १७५ अधिकारी, २२ गाड्यांचा ताफा, सिनेमा स्टाईल कारवाई !
नाशिक, प्रतिनिधी : आयकर विभागाने नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये टाकलेल्या छाप्यात अक्षरशः सामान्य व्यक्ती चक्रावून जाईल इतके म्हणजे तब्बल 240 कोटींचे घबाड सापडले आहे. 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने यावेळी जप्त करण्यात आले. या कारवाईने उत्तर महाराष्ट्र पुरता हादरून गेला असून, इतकी अफाट माया या महाभागांनी आतापर्यंत रिचवली कशी, त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही, अशी खमंग चर्चाही यानिमित्ताने सुरू झालीय. मात्र, दुसरीरडे या चक्क गारठवणाऱ्या थंडीत भल्याभल्यांना घाम फुटला असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक आयकर विभागाच्या अन्वेषण विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, २२ डिसेंबरला पहाटेपासून नंदुरबार शहरातील जवळपास २० ते २२ कारचा ताफा वेगवेगळ्या भागात अचानक दाखल झाला. यावेळी मोठमोठ्या बिल्डर्स, सरकारी कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. नंदुरबारमधील बडे डेव्हलपर्स, कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकांसह भागीदार असणाऱ्या ६ ते ८ व्यापऱ्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवरही आयकर विभागाने धाड टाकली, याचवेळी बिल्डर्स व ठेकेदारांच्या कुटुंबाशी संबंधीत व्यावसायिक भागीदार असणाऱ्या नाशिक, धुळेमधील व्यापारांच्या निवासस्थानाची कार्यालयांची आयकर विभागाने एकाच वेळी धाड टाकत कसून तपासणी सुरु केली. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये 32 ठिकाणी जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले. बुधवारी, 22 डिसेंबर रोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई सुमारे पाच दिवस चालल्याचे समजते. मात्र, याची कुणकुणही कोणाला लागू देण्यात आली नाही. या कारवाईत एकूण 240 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. एकाचवेळी नंदुबारसह इतर ठिकाणच्या बिल्डरची कार्यालये, घरे, भागीदारांचे निवासस्थान, नातेवाईक यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले. नाशिकमध्ये शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत आयकर विभागाने छापे टाकले. या कॉलनीतील व्यावसायिकांची घरे आणि त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. विशेषतः देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही कित्येकांचे घबाड सापडल्याचे समजते. या संबंधित व्यावसायिकांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतक्या मध्यवस्तीत कारवाई होऊनही याचा थांगपत्ता कुणाला लागू देण्यात आला नाही.
उत्तर महाराष्ट्रातील ही बडी कारवाई करण्यासाठी 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले. त्यांच्या दिमतीला एकूण 22 गाड्यांचा ताफा आणि तगडा पोलीस बंदोबस्त होता. या कामासाठी नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण येथील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. सर्वांची वेगवेगळी पथके तयार केली. काही जणांनी गुजरातमधून धुळेमार्गे तर काही जण नवापूरहून नंदुरबारमध्ये पोहचले. दुसरीकडे नाशिक, धुळ्यात अशा वेगवेगळ्या मार्गाहून हा ताफा पोहचला. आयकर विभागाच्या पथकाला यावेळी अनेक धक्कादायक बाबी समजल्या. अनेक व्यावसायिकांनी तब्बल 25 कोटींचे व्यवहार रोखीत केल्याचे समोर आले. यावेळी तब्बल 6 कोटींची रोकड आणि 5 कोटींचे मौल्यवान दागिने सापडले. या अफाट मायेची मोजदाद करायला पथकाला जवळपास 12 तास लागले. पैसे मोजता मोजता मशीन थकल्या आणि दागिने मोजता मोजता हात दुखू लागले, अशी अवस्था यावेळी होती. अजय देवणगणचा रेड सिनेमा अनेकांना आठवत असेल. अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी होती.
आयकर विभागाला यावेळी पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात अतिशय मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे, मोत्याची दागिने अशी मोठी जडजवाहिरे सापडली. अनेकांनी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळले. कित्येकांचा नातेवाईकांच्या घरी पैसा होता. तर कित्येकांनी दुसऱ्याच्या नावावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचेही समोर आले आहे. या कारवाईने उत्तर महाराष्ट्रातील अफाट माया कमावणाऱ्या बिल्डर आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.