पंधरा वर्षीय मुलाचा क्रिकेट खेडताना चक्कर येऊन मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील सिडको भागात क्रिकेट खेळताना अचानक चक्कर आल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून श्रेयस सुधीर ढोरे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
नाशिकमधल्या सिडकोतल्या रणभूमी मैदानावर श्रेयस आणि त्याच्या मित्रांचा रोज क्रिकेटचा डाव रंगायचा. रविवारीही त्यांचा क्रिकेटचा डाव रंगला. मात्र, श्रेयसला अस्वस्थता जाणवू लागली. त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. काही वेळानंतर त्याला अचानक चक्कर आली. तो खाली बसला. मुलांना वाटले दमला असेल. त्यामुळे त्यांनी त्याच्याभोवती कोंडाळे केले. काही वेळातच त्याची तब्येत खालावली. तो बेशुद्ध पडला. मुलांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याच्या तोंडात फुंकले, तर कोणी वारा घालण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयसने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या श्रेयसच्या मित्रांनी त्याला उचलून वाहनापर्यंत नेले आणि थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
श्रेयसची तब्येत बिघडल्याची माहिती त्याच्या घरी देण्यात आली. श्रेयसचे वडील, आई आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.