५० हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे): हायमास्ट इलेक्ट्रिकल पोल बसविण्याच्या कामाच्या उर्वरित रकमेचा चेक काढून देण्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपयांची लाच मागणार्या ग्रामसेवकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील 12 मीटर उंचीचा हायमास्ट इलेक्ट्रिक पोल बसविण्याच्या कामाच्या उर्वरित 1 लाख 58 हजार रुपयांचा चेक काढून देण्याच्या मोबदल्यात हायमास्ट पोल बसविण्याच्या कामाच्या एकूण रकमेच्या 10 टक्के रकमेची लाच बाभुळगाव येथील ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यांनी मागितली. तडजोडीअंती 50 हजारांची लाच देण्याचे ठरले त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाच्या सापळा रचून ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे यांनी तक्रारदाराकडून पंच व साक्षीदारांसमक्ष 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने वानखेडेविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधन सन 2018) चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक करीत आहे