आईचं छत्र हरपल्यानंतर नराधम बापाकडून चिमुकल्यांचा अमानुष छळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी)। आपल्या दोन लहान मुलांना आईचं छत्र हरपल्यानंतर बेदम मारहाण व त्यांचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील इगतपुरी तालुक्यात घडला असून नराधम बापाविरुद्ध इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जन्मदात्या बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या मुलांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. दुर्दैवानं या मुलांना जीव लावणाऱ्या आजीवरही काळानं घाला घातला. त्यामुळं त्या लहान बाळाकडं लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हतं. मुलांची जबाबदारी खांद्यांवर पडलेल्या बापानं दुसरं लग्न केलं. त्यानंतर दिवसेंदिवस मुलांचे हाल वाढत गेले. पोलीस बापाकडून मुलांना जबर मारहाण सुरू झाली. आज या नराधम बापानं हद्द केली. मुलांना काठीनं व हातानं जबर मारहाण केली. रेल्वे पोलिसामध्ये कार्यरत असलेल्या राहुल विजय मोरे असं त्याचं नाव आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुलांना सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलांना प्रचंड मारहाण झाली असून, ते घाबरले असल्याचं जवळच्या नातेवाईकानी सांगितलं. या प्रकरणी राहुल मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.