भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

नाशिक विभागात रस्ते,वस्त्यांची पाचशेहून अधिक जातीवाचक नावे बदलली

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून पाचशेहून अधिक जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून समाजकल्याण विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

आज विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय दक्षता व नियंत्रण, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर अनुषंगिक विषयांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळे येथून जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जळगांव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नंदुरबार येथून जिल्हाधिकारी महेश पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यासोबत उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे, पोलीस उपअधिक्षक शैलेश जाधव विभागीय आयुक्त कार्यालय येथून उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पुढे म्हणाले की, राज्यातील, विभागातील, जिल्ह्यातील तसे ग्रामपंचायत, गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक गावांची नावे, वस्त्यांची, रस्त्यांची नावे जातिवाचक असल्याची बाब समोर आल्याने राज्यातील सामाजिक सलोखा व सुधारणा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ही जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत समाजकल्याण विभागाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध समित्या स्थानिक स्तरापासुन ते राज्यस्तरापर्यंत विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागाचा आढावा घेत नाशिक जिल्ह्यातील शहरी क्षेत्रातील 19 नावे बदलण्यात आली आहेत तर नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात 324, धुळे जिल्हा 11, नंदुरबार जिल्हा 75 ,जळगाव जिल्हा 28 अहमदनगर जिल्ह्यात 68 ठिकाणाची नावे असे एकुण पाचशेहुन अधिक नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंर्तगत घडलेल्या गुन्हयांच्या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. सदर अधिनियमांतर्गत गेल्या तीन महिन्यात च्या कालावधीत घडलेल्या गुन्हांचा तपशील जिल्हावार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आलेले अर्थसहाय्य व त्यासंदर्भात करण्यात येत असलेली उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे गमे यांनी यावेळी सांगतिले.
नाशिक विभागात 340 तृतीयपंथीयांचे लसीकरण पूर्ण
विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, या कल्याण मंडळाचा देखील आढावा घेण्यात आला. नाशिक विभागात एकूण 600 तृतीयपंथीयांची संख्या असून त्यापैकी 340 तृतीयपंथीयांना कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे विभागात 7 व्यक्तींना ओळख प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विभागीय आयुक्त श्री गमे यांनी तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिना पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयाना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्नबाबत उपस्थिताना माहिती करुन दिली. त्यांच्या सुचनांच्या अनुषंगाने विभागातील सर्व जिल्ह्यात यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त गमे यांनी संबंधित यत्रणांना दिल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!