उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात,न्यायालयाची दखल, डॉ. वैशाली वीर-झनकरांचा कारागृहात मुक्काम वाढला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। लाचप्रकरणात पोलिसांना गुंगारा देऊन अडचणीत सापडलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. नियमित जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा दोन दिवस म्हणजेच, सोमवार (ता. २३)पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या प्रकरणात न्यायालयाने गेल्या बुधवारी (ता. १८) झनकर यांचे साथीदार शिक्षक पंकज दशपुते व चालक ज्ञानेश्वर येवले यांना जामीन मंजूर केला असून, त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. झनकर यांनी अटकेपूर्वी पोलिसांना गुंगारा दिला होता, तसेच उपचाराच्या नावाखाली बहुतांश काळ जिल्हा रुग्णालयात गेल्याची दखल घेत न्यायालयाने रुग्णालय प्रशासनास नोटीस बजावली आहे. यादरम्यान नियमित जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. २०) सुनावणी होणार होती; परंतु ही सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे झनकर यांना आणखी दोन दिवस जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्या अटकेनंतर शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. मात्र, आठवडाभराचा कालावधी उलटूनही शासन स्तरावरून दखल घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालकांनी निलंबन अहवालापाठोपाठ केलेल्या पत्रव्यवहारात शासनस्तरावरून होणाऱ्या दिरंगाईमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद केले आहे. तरीही झनकर यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉ. वैशाली वीर-झनकर प्रकरणात शासनाच्या भूमिकेकडेही संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.