कांदा व्यापाऱ्यांकडे आयकरचे छापे : तब्बल २५ कोटींचे घबाड सापडले !
नाशिक, प्रतिनिधी : पिंपळगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागानं छापेमारी केली. हे छापासत्र शनिवारी पूर्ण झालं. धक्कादायक म्हणजे या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. गेल्या चार दिवसांपासून सलग एकाच ठिकाणी आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या करवाईकडे लागले आहे.
आयकर विभागानं केलेल्या या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सलग एकाच ठिकाणी नाशिकमधील 4 ते 5 आणि पिंपळगावच्या 8 ते 10 व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी छापासत्र सुरु केलं होतं. आयकर विभागाच्या 80 कर्मचाऱ्यांना रोख रक्कम मोजायला तब्बल 19 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. पथकानं जप्त केलेली रोख रक्कम मोजण्यासाठी पथकाच्या 70 ते 80 अधिकारी- कर्मचाऱ्यांना नाशिक आणि पिंपळगावमधील काही बँकांमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता रक्कम मोजण्यास सुरुवात केली. तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत ही रक्कम मोजून पूर्ण झाली. म्हणजे जवळपास 18 ते 19 तास रोकड मोजण्यास लागले. 26 कोटींच्या रकमेत 500, 100 आणि 200 च्या नोटा सर्वाधिक होत्या.
देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक मध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते.