बसच्या जोरदार धडकेत रिक्षाचालक जागीच ठार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी) :- बिटको चौकातून जेलरोड कडे जाणाऱ्या रिक्षाला लक्झरी बस ने धडक दिल्याने रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. लक्झरी बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास गोरेवाडी शास्त्रीनगर येथील अनिल बाळू ठाकरे (वय ३५) हा युवक आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच १५ एफ यु ७२७६) घेऊन बिटको चौक उड्डाणपूल खालून जेलरोडकडे जात होता. त्यावेळी नाशिक पुणे रोड वरील दत्तमंदिर कडून सिन्नर कडे जाणाऱ्या लक्झरी बस (क्र एमएच०४ जी पी ०१४४) ने रिक्षास जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक अनिल ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी लक्झरी बस चालक हसन हुसेन शेख यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करीत आहे.
रिक्षा चालक अनिल ठाकरे हा युवक गोरेवाडी शास्त्री नगर येथील रहिवासी असून त्याच्या पशच्यात आई, वडील, पत्नी, दोन मुली आणि दोन भाऊ असा परिवार आहे. रिक्षा चालवून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाने तो परिचित होता. त्याच्यावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.