मध्यरात्री गाेडावून चे शटर तोडत २७ लाखांची विदेशी दारू केली लंपास !
Monday To Monday NewsNetwork
नाशिक (प्रतिनिधी): येथील शिंदेगाव ते नायगाव रस्त्यावरील विदेशी मद्याच्या गोडावूनचे मध्यरात्री शटर तोडत अज्ञात व्यक्तींनी गोडावूनमधील २७ लाख रुपयांच्या विदेशी मद्याची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील शिदेंगाव येथे नायगाव रस्त्यावर राजस्थान लिकरचे विदेशी मद्याचे गोडावून मध्ये विविध कंपनीच्या विदेशी मद्याचा साठा ठेवण्यात होता शनिवारी मध्यरात्री तीन अज्ञात व्यक्तींनी लोहिया कम्पाउंंडमधील सुरक्षारक्षक मयूर शांताराम मगर हा खोलीत झोपलेला असताना त्याला दारूचे गोडावून कुठे आहे अशी विचारणा केली. मात्र, त्याने माहिती नसल्याचे सांगितल्याने मगरला मारहाण करीत चादरीने बांधण्यात आले. त्याच्याकडून मोबाइल आणि कम्पाउंडच्या गेटची चावी हिसकावून घेतली. राजस्थान लिकर गोडावूनचे कुलूप लोखंडी टामीने तोडून सीग्राम कंपनीच्या रॉयल स्टॅग मद्याचे वेगवेगळे ३७० बॉक्स आयशर वाहनातून लंपास केले. राजस्थान लिकर लि. कंपनीचे व्यवस्थापक दीपक दत्तात्रय नाईक यांच्या फिर्यादीनुसार या मद्याची किंमत २६ लाख ९४ हजार २०३ रुपयांचे असून सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहे.