नाशिक मधून ३ महिन्यांत ८१ मुलांचे अपहरण; ४१ जण अजूनही बेपत्ता
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सन २०२२ या वर्षात जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ८१ अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरातून गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी ते ३१ मार्चच्या दरम्यान तब्बल ८१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले आहे. त्यापैकी फक्त ४० जणांचा शोध लागला असून, अजूनही ४१ जण बेपत्ता आहेत. अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यामार्फत बेपत्ता मुलामुलींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
अनेक अल्पवयीन मुले घरात कोणत्या न कोणत्या कारणाने हट्ट धरतात,रागावतात आणि या रागाच्या भरात घर सोडून जातात तर काहींचे अपहरण केले जाते म्हणून पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे.पालकांनी थोडा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्याच्याशी बोलण्याची व समजवण्याची वेगळी सकारात्मक पद्धत ठेवल्यास असे प्रसंग टाळता येतील.