द्वारका परिसरात सशस्त्र हाणामारी; एकाचा मृत्यू, संशयित ताब्यात
नाशिक (निशाद साळवे)। येथील द्वारका परिसरातील वडाळा नाका येथील महालक्ष्मी चाळीत रात्री ११ वाजेच्या सुमारास उसळलेल्या दंगलीत दंगलखोरांनी चाकू व चॉपरसारख्या हत्यारांचा वार केल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे वृत्त समजताच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नऊ संशयितांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की वडाळा नाका येथील महालक्ष्मी चाळ येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत भांडण सुरू झाले. यावेळी संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवून करण राजू लोट व आकाश संतोष रंजवे यांना “तू मेरी पुलिस को टीप क्युं देता है?” अशी विचारणा करून बाचाबाची व शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. यावेळी संशयित विशाल बेनवाल, सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरिष पवार, मनीष दुलगज व शिवम् पवार हे त्या ठिकाणी जमा झाले. वाल्मीकी मंदिराजवळ या संशयितांनी शिवीगाळ करीत हातात चाकू व चॉपरसारखी हत्यारे घेऊन समोरच्यांच्या अंगावर धावले.
यावेळी आकाश संतोष रंजवे याच्यावर चाकू व चॉपरसारख्या हत्याराने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात करण लोट याच्या पाठीवर हत्याराचा वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी संशयितांनी करण लोट यांच्या आईला व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वडाळा नाका परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव निवळला असून, अधिक तपास सुरू आहे.