गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, ८७ लाखाचा अवैध गुटखा जप्त
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुटखाविरोधी अभियाना अंतर्गत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडला आहे. यात सुमारे सत्त्याऐंशी लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी सहा जून पासून जिल्हाभरात गुटखा विरोधी अभियान सुरु केले आहे. सदरच्या कारवाई दरम्यान पान टपऱ्या, गोडावून,दुकाने व इतर अस्थापणांची कसून तपासणी सुरु आहे. याच दरम्यान गुरुवारी २२ रोजी गुटख्याच्या आणखी एक कंटेनर ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. त्यातून सुमारे सत्त्याऐंशी लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
गुटख्याने भरलेला कंटेनर दिल्ली येथून मुंबई-आग्रा रोडने त्र्यंबकेश्वर,जव्हार, मोखाडामार्गे भिवंडी येथे जात होता. प्रवासादरम्यान त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आंबोली टी पॉईंट येथे ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कंटेनर पकडला आहे. त्यात रुपये ८७,३८,१००/- लाखांचा एस एच के नावाचा गुटखा मिळून आला आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर सह नाशिक जिल्ह्यात स्वागत करण्यात येत आहे.