Remdesivir काळा बाजार! बाराशेचे इंजेक्शन २५ हजारांना विकणाऱ्या डाॅक्टरला अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे): कोरोना संसर्गाने सर्वत्र फोफावत असतांना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार समोर आला आहे बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी रात्री रंगेहाथ पोलीस यांच्या भरारी पथकाकडुन पकडण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फिरफिर करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी संबंधित क्रमांकावर कॉल केला. तो कट करण्यात आला. काही वेळातच संबंधितांनी कॉल केला. यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रतिइंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. संबंधित इंजेक्शन देण्यासाठी अमृतधाम परिसरात रात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान आले. मात्र श्री. मोहिते यांच्याकडे रुपये कमी पडत असल्याचे त्यांनी ते अमृतधामजवळील एका एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढण्यास गेले. तेथे त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री १०० नंबरवर संपर्क साधून याबाबत तक्रार दिली. या वेळी सद्गरू हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्याअगोदर श्री. मोहिते यांनी पोलिसांना घटना कळविली.
दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासमवेत असलेल्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेतले. ही बाब डॉ. मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून निघाले. दरम्यान, पोलिस गाडीही त्याच वेळी आली, त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत डॉ. मुळूक यांना अडविले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता यामध्ये पोलिसांना ३ इंजेक्शन व रोख रक्कम मिळून आले. डॉक्टरला अटक करण्यात आली असून पंचवटी पोलिस ठाण्यात रात्री बारापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला संशयित डॉ. मुळीक यांनी यापूर्वी किती रेमडेसिवीर विक्री केले याचाही तपास पोलिस करणार आहेत.