दोन गटांत तुफान धुमश्चक्री; दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे) :- देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासमोर बस स्टॉप येथे दोन गटांत झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली. याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी आहेर व पोलीस हवालदार साळुंके हे शिवजयंतीनिमित्त गस्त घालत होते. शासनाच्या निर्णयानुसार काल शिवजयंतीची मिरवणूक रद्द करण्यात आल्याने तरुण-तरुणी काल सकाळपासूनच गटागटाने गाड्यांवर फिरताना दिसत होते. अशाच रस्त्याने फिरताना संसरी गाव व कारणवाडी येथील युवकांमध्ये पोलीस ठाण्यासमोरील बस स्टॉप येथे काही तरी कारणातून वाद झाले. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली आहे.
अशी माहिती पोलीस हवालदार साळुंके व आहेर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी असलेली गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचवेळी या दोन्ही पोलीस कर्मचार्यांच्या दिशेने शंकर देवकर, श्रावण माने, रोहित कुसमाडे, दिपक नलावडे, नितीन जाधव आदींसह काही युवकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत साळुंके व आहेर यांना जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध भादंवि कलम 307, 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.