बंद घरफोडत १२ लाखांच्या दागिन्यांची चोरी
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील लॉकर व लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले 12 लाख रुपयांचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याची घटना जेलरोड येथील शिक्षक कॉलनीत घडली आहे.
अधिक माहिती अशी, की सेवानिवृत्त शिक्षिका शंकुतला नारायण पाटील (वय 64, रा. प्लॉट क्र. 7, ’आई’ बंगला, शिक्षक कॉलनी, जेलरोड) यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. त्या आपल्या पतीसोबत सासु ना भेटण्यासाठी औरंगाबाद येथे गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी ही घरफोडी केली. बेडरूममध्ये असलेल्या दोन लोखंडी कपाटांतील लॉकर व लोखंडी पेटीत ठेवलेल्या 45 हजार रुपयांचा 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 2 लाख 40 हजार रुपयांची 80 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पदक व काळे मणी असलेल्या दोन पोती प्रत्येकी 40 ग्रॅम वजनाच्या, 90 हजार रुपयांची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 2 लाख 40 हजार रुपयांचे 80 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे चप्पलहार, 1 लाख 20 हजार रुपयांच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन, 90 हजारांचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेली तीन मंगळसूत्रे, 30 हजार रुपयांच्या दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन वाट्या, 30 हजारांचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स व वेल, 27 हजारांचे नऊ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, 66 हजारांच्या 22 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 7 हजार रुपयांचे चांदीचे नाणे, त्यावर महावितरणचा शिक्का असलेले, पतीला सेवानिवृत्तीनिमित्त मिळालेली भेट, रोख रक्कम, तसेच पतीचे मित्र सचिन वाघ यांनी त्यांच्याकडे ठेवण्यास दिलेले 50 हजार रुपये व प्लॉट विक्रीतून आलेले दोन लाख रुपये असा एकूण 12 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.