लाल मिरची विकत घेण्याचे आमिष देऊन शेतकऱ्याची १५ लाखांची फसवणूक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नाशिक, निशाद साळवे : शेतकऱ्यांना आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून आले विकत घेण्याचे आमिष देत किलोमागे एक रुपया कमिशन देण्याचे आमिष देत कर्नाटक येथील व्यापाऱ्याला १० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ताजा असतानाच कोल्हापूरच्या एका शेतकऱ्याला लाल मिरची विकत घेण्याचे तसेत जागेवर पैसे देण्याचे अमिष देत तब्बल १५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार महामार्गावरील एका हॉटेलमध्ये उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेली माहिती व संदीप पाटील (रा. शिरोळ, कोल्हापूर) यांच्या तक्रारीनुसार, संशयित मोहसीन अकिल शेख व त्याचे दोन साथीदारांना संगनमत करुन पाटील यांना फोनवर संपर्क साधून शेतीमालाचा व्यापारी असल्याचे भासवत पाटील यांच्याकडून १५ लाखांची लाल मिर्ची विकत घेणार असल्याचे सांगत जागेवर पैसे देऊ असे सांगितले. पाटील यांना विश्वास पटल्यानंतर त्यांनी मिर्चीचा ट्रक भरून नाशिक येथे एका हॉटेलमागे आणला. संशयितांनी ट्रकमधील मिर्ची दुसऱ्या ट्रकमध्ये लोड करून पैसे लगेच देतो, असे सांगत बँकेचा खोटा धनादेश दिला. दोन दिवस उलटूनही संशयित फोन करून प्रतिसाद देत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मोहसीन अकिल शेख व त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.