अचानक छाती दुखते च्या कारणाने एकाच दिवसात नाशिक मध्ये पाच मृत्यू
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, प्रतिनिधी/निशाद साळवे: अचानक छाती दुखणे, श्वास घेण्यास त्रास होण्याच्या किरकोळ कारणातून सुरू असलेल्या मृत्यूंची श्रृखंला सुरुच आहे. छाती दुखत असल्याचे निमित्त होउन श्वास घेण्यात त्रास होण्याने शनिवारी दिवसभरात पाच जणांचे मृत्यू झाले.
जेल रोडला पंचक शिवारातील गणेश व्यायाम शाळेजवळ बेनडीक्ट ॲन्थोनी स्वामी (वय ६४, तारामंडळ सोसायटी) यांना काल शनिवारी (ता.१) साडे चारच्या सुमारास छातीत दुखून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, पावणे आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. डॉ. पगारे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत सुचीत दिलीपराव देशमुख (वय ३४, अंजना लॉन्समागे, नरहरी नगर पाथर्डीगाव) यांना काल पहाटे पावणे पाचच्या सुमारास ऱाहत्या घरी छातीत दुखत असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. पवार यांनी सव्वा सातच्या सुमारास मृत घोषित केले. प्राजक्ता हर्षल संधनशिव (वय २८, राधे रो हाउस, माळी मंगल कार्यालयाजवळ मखमलाबाद ) यांना काल शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास राहत्या घरी छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. पगारे यांनी मृत घोषित केले. चौथ्या घटनेत श्रावणी नितेश भागवत (वय १३, राजवाडा, आनंदवल्ली, गंगापूर रोड) ही शनिवारी (ता.१) दुपारी साडे बाराच्या सुमारास राहत्या घरी बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दुपारी साडे तीनच्या सुमारास डॉ. गडे यांनी मृत घोषित केले. पाचव्या घटनेत रामदास अण्णासाहेब कातोरे (वय ५८, नागरे मळा, हनुमानवाडी पंचवटी) यांना काल रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरी छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, रात्री साडे अकराच्या सुमारास डॉ. तडवी यांनी तपासून मृत घोषित केले.