अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवत लग्नाचा डाव, २० जणांना बेड्या
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक/प्रतिनिधी : दोघा अल्पवयीन मुलींना तुमच्या कुटुंबियांना पैसे देतो असे आमिष दाखवून पळवून नेत कुटुंबियांच्या संमतीविना त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न असलेल्या येवल्यातील दोघा वरांसह त्यांच्या कुटुंबियांतील २० जणांना रवळगावच्या ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
रवळगाव येथील आदिवासी समाजातील परिस्थितीने गरीब असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विवाह येवला तालुक्यातील कासारखेडे व सावरगाव येथील विवाहेच्छुक तरुणांशी लावून देण्यासाठी रवळगाव येथील एक महिला व येवला तालुक्यातील दलाल दशरथ गंगाधर पवार (रा. सावरगाव) यांनी या दोन मुलींना त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीविना फूस लावून पळवून नेले. कासारखेडे येथे दोन मुलांशी तुमचा विवाह लावून देतो व त्या बदल्यात तुमच्या कुटुंबियांना आम्ही काही पैसे देतो असे सांगितले. दोन मुलींना आई-वडिलांच्या संमतीशिवाय बळजबरीने लग्नासाठी घेऊन जात असल्याची माहिती रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व रवळगाव ग्रामस्थांना समजली. त्यांनी या दोन मुलींच्या घरी जात संबंधित महिला व दोन्ही वराकडील कुटुंबियांना पकडून ठेवत दिंडोरी पोलिसांच्या माहिती दिल्याने २० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पाेक्सो कायदा तसेच अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस तपास करत आहेत.