मुलगी दाखवून विवाह लावून देण्याच्या बहाण्याने ३ लाखात फसवणूक, दोघांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येवल्यात विवाह इच्छुकांची फसवणूक करणार्या दलालांची टोळी शहर पोलिसांकडून उघड झाली असून टोळीतील दोघांना पोलिसांनी शिताफीने गजाआड केले आहे.
येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहर व परिसरातील विवाह इच्छुक तरुणाला मुलगी दाखवून विवाह लावून देण्याच्या बहाण्याने येवल्यातील केदार कुटुंबाची 3 लाख रुपयांची फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विवाह इच्छुक तरुणाची आई लता केदार यांच्या तक्रारीनुसार शहर पोलिसांत काही दिवसांपूर्वी विवाह लावणारे दलाल असलेले संशयित आरोपी साहेबराव विठ्ठल गिते (रा. ब्राम्हणवाडे, ता. सिन्नर) आणि संतोष मुरलीधर फड (रा. भुसे भेंडाळी, ता. निफाड) यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली.
येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, पोलीस हवालदार दिपक शिरुडे, पोलीस नाईक राकेश होलगडे, पोलीस शिपाई गणेश घुगे, महिला पोलीस शिपाई माई थोरात यांच्यासोबत तक्रारदाराने दिलेले पुरावे यावरून कसून तपास केला. तेव्हा दोघा मुख्य संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान त्यांच्या टोळीतील इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून लवकरच संपूर्ण टोळीला गजाआड केले, जाईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी दिली आहे. दरम्यान अशा पद्धतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.