शेतीच्या वाटेहिश्श्याच्या वादातून तुफान हाणामारीत एका भावाचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे) :- जमिनीच्या वादातून दोन भावांच्या कुटुंबांत झालेल्या तुफान हाणामारीत एका भावाचा मृत्यू झाला असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन्ही परिवारांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की भास्कर शिवराम साळवे (वय 59, रा. नायगाव रोड, शिंदे गाव) असे या हाणामारीत मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे. शिंदे गावातील नायगाव रोड येथे भास्कर शिवराम साळवे व रामचंद्र शिवराम साळवे हे दोन भाऊ आपापल्या कुटुंबासह शेजारी शेजारी राहतात. दरम्यान, या दोन भावांमध्ये शेती व जागेच्या वाटेहिश्श्यावरून दोन्ही कुटुंबांत वाद सुरू आहेत. अनेकदा हे वाद थेट पोलीस ठाणे व सरकारदरबारी गेले आहेत. त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. दरम्यान, काल रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास संशयित रामचंद्र साळवे हा शेजारी राहणारा भाऊ भास्कर साळवे याच्याकडे पाहून शिवीगाळ करीत होता. त्या वेळेस माझ्याकडे पाहून शिवीगाळ का करतोस, याचा जाब विचारण्यासाठी भास्कर साळवे हा रामचंद्र साळवे यांच्याकडे गेला. त्यावेळी भाऊ रामचंद्र शिवराम साळवे, पुतण्या देवीदास रामचंद्र साळवे, वहिनी रंभाबाई रामचंद्र साळवे व नातू प्रफुल्ल विजय पाटील आणि आझाद विजय पाटील यांनी भास्कर साळवे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे ते अस्वस्थ होऊन खाली कोसळले. त्यांना अधिक उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले.
दरम्यान, दुसर्या परिवाराकडून देवीदास रामचंद्र साळवे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे, की काल रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास भास्कर साळवे, सनी साळवे, मिलिंद साळवे, सुमन साळवे, रूपाली साळवे, पूनम साळवे व सोनाली साळवे यांनी आमच्या घरी येऊन शेतीच्या वाटेहिश्श्यावरून कुरापत काढली व लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी वरील संशयितांनी केलेल्या मारहाणीत फिर्यादी देवीदास साळवे याचे आईवडील जखमी झाले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कंदारे करीत आहेत.