मास्तर तुम्हीही… मुख्याध्यापकासह उपशिक्षिकेला लाच घेताना रंगेहाथ अटक
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शाळेतील शिक्षकाला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकासह प्रत्यक्ष लाच घेणाऱ्या उपशिक्षिकेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
याप्रकरणी समजते की, सर्वोदय शिक्षण संस्था संचलित जागृती माध्यमिक विद्यालय, सोयगाव या शाळेत तक्रारदार महिला शिपाई म्हणून नोकरीस आहे. सदर शाळा मालेगाव महानगरपालिका हद्दीत गेल्याने सदर शिपाई महिलेच्या पगारात वाढ होऊन तिला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक राहुल प्रकाश मोराणकर व उपशिक्षिका श्रीमती मनीषा सुदाम चव्हाण यांनी १२५० रुपयांची लाच मागितली.
याबाबत सदर शिपाई महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. म्हणून या शाळेत सापळा लावला असताना मुख्याध्यापक मोराणकर यांनी सदर रक्कम श्रीमती मनीषा चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे ही लाचेची रक्कम मुख्याध्यापकांच्या कक्षात घेतांना दोघांना पकडण्यात आले.