नाशिक पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडीत भाजपमधील नाराज शुभांगी पाटील यांना मविआचा पाठिंबा
नाशिक, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। नाशिक पदवीधर मतदारसंघात आता ठाकरे गटाने भाजपमधील (BJP) नाराज शुभांगी पाटील सूर्यवंशी यांना पाठिंबा जाहीर केलाय. मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शुभांगी पाटील या बैठकीला उपस्थित होत्या. ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देत आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. त्यामुळे आता ठाकरे गट नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवतोय यावर शिक्कामोर्तब झालंय.
भाजपकडून आलेला एबी फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यातच सत्यजित तांबे यांनी अचानक उमेदवारी दाखल केल्यामुळे आणि भाजपकडून त्यांना पाठिंबा दिला जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर शुभांगी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. शुभांगी पाटील आज सकाळीच मातोश्री निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाल्या. तिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने जाहीर केला.
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. पाच जागांवर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना रंगलेला असताना नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ.सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेत सत्यजित तांबेंना अपक्ष म्हणून उभे केले. यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली. कोणालाही विश्वासात न घेतल्याने सुधीर तांबेंनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त करत सत्यजित तांबे यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे ते आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं. नाशिकमधून २२ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले असले तरी एकाही अधिकृत पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता होती.
कोण आहेत शुभांगी पाटील?
शुभांगी पाटील या महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं बीए. डीएड. एम.ए. बीएड. एलएलबी शिक्षण झालं आहे. 22 सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी भाजपता प्रवेश केला. महाराष्ट्र स्टुडंटस असोसिएशनच्या त्या संस्थापक आहेत. मविआमध्ये समन्वयाचा अभाव
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबद्दल महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव दिसून आला, अशी कबुली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. तर संजय राऊत दिल्लीला राहतात त्यांना फार गोष्टी माहित नसतात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय. तसंच 16 तारखेला महाविकास आघाडीच्या तांबे यांच्या तोडीचा उमेदवार कळेल, असं पटोलेंनी सांगितलंय.
दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या भाजपमधील बंडखोरीबाबत फडणवीस यांनी सूचक विधान केलंय. योग्य वेळी योग्य गोष्टी समजतील असं फडणवीस म्हणाले. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबतही त्यांनी थेट बोलणं टाळलं. नाशिक निवडणुकीमध्ये आता 22 अपक्ष मैदानात
नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये आता 22 अपक्ष मैदानात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 44 उमेदवारांनी अर्ज भरला होता. यामध्ये भाजपचे तीन उमेदवार होते. मात्र त्यांना मुदतीत एबी फॉर्म न दिल्यामुळे आता त्यांनी बंडखोरी करण्याची भाषा सुरु केली आहे.