नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाखांच्या नोटा गायब !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नाशिक, निशाद साळवे : हाय सिक्युरिटी असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. अत्यंत हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून एवढी मोठी रक्कम नेमकी कशी आणि कुठे गेली याची चौकशी सुरू असून, पोलीस तपासा सोबतच, करन्सी नोट प्रेसच्या व्यवस्थापनाने प्रकरणाची अंतर्गत चौकशी देखील सुरू केली आहे.
देशभरातील नोटा छपाईच मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये अत्यन्त हाय सिक्युरिटी असूनही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरू झाली आहे..अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडर देखील तयार नाहीत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावे लागलं अशी चर्चा आहे.
याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 500 रुपयांचे 10 तयार बंडल असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 12 फेब्रुवारी पासून हे बंडल गहाळ झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे..दरम्यान करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेस मधील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जातील असं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं आहे. नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकली काढले. यावेळी मात्र प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासात या प्रकरणाची अनेक कंगोरे समोर येण्याची शक्यता आहे.