नाशिक पदवीधर मध्ये अखेर सत्यजीत तांबे विजयी, तांबे भाजपात जाणार?
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल अखेर जाहीर झालाय. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय.या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झालाय. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झालाय.
सत्यजीत तांबे यांच्या या विजयावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आलीय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या निकालावर प्रतिक्रिया दिलीय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सत्यजीत तांबे यांचं कौतुक केलं. त्यांच्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे सत्यजीत तांबे खरंच भाजपात जाणार की काय? अशी चर्चा आता रंगू शकते.
खरंतर ही चर्चा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सुरु आहे. पण सत्यजित तांबे यांनी याबाबत कमालीचं मौन बाळगलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचं कौतुक केल्याने वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.
“नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी एकत्र येत तेथील युवा नेता सत्यजीत तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण सत्यजीत तांबे यांनी खूप चांगला लढा दिला. खूप चांगल्या मतांनी ते निवडून आले. त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
ही तर भाजपची खेळी?
भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. पण भाजपकडून त्यांना अधिकृत पाठिंबा देण्यात आला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही भाजपचीच राजकीय खेळी असल्याचा अंदाज बांधला जात होता. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपच्या गोटात कमालीची शांतता होती. भाजपकडून नाशिकच्या जागेसाठी उमेदवारही जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे ही भाजपची खेळी असल्याचं मानलं जात होतं.