त्या फिर्यादीनेच रचला १५ लाख रुपयांच्या चोरीचा डाव
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी)। येथे भर दिवसा झालेल्या स्विफ्ट गाडीची काच फोडून १५ लाख रुपयांच्या रोकड चोरी प्रकरणात चोरीचा डाव फिर्यादीनेच रचल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
यासंदर्भात पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी, स्विफ्ट गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने १५ लाख रुपये असलेली बॅग चोरून नेल्याची फिर्याद मयूर राजेंद्र भालेराव (रा. तिवंधा चौक, नाशिक) यांनी शुक्रवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास दिली होती. याबाबत मुंबई नाका पोलीसांनी कसून तपास करत असतांना फिर्यादीचा पूर्व इतिहास बाबत माहिती मिळाली रोलेट जुगार चालविणारा कैलास शाह याच्यासाठी तो काम करीत असल्याचे त्यांना कळाले शाह याचा बांधकाम व्यावसायातील भागीदार संदीपसिंग सलोजा याने वरील रक्कम शाह याला देण्यासाठी भालेरावच्या ताब्यात दिली होती
मात्र, कैलास शाह याच्याशी झालेल्या भांडणामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी फिर्यादी भालेराव आणि साथीदार रामा सुंदर शिंदे या दोघांनी चोरीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादीनेच चोरी केल्याचे उघड झाले. यामुळे भालेराव व शिंदे या दोघांना अटक करण्यात आली असून, चोरी करण्यात आलेली रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात असून ही कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.