“पावडरने सोन्याचे दागिने चमकवून देतो” सांगत दागिने घेऊन चोरटे पसार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन-MTM Newsnetwork :
नाशिक (निशाद साळवे): येथे एका महिलेला तुमचे सोन्याचे दागिने पावडरने चमकवून देतो, असे सांगून सुमारे ७५ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथील गिते मळ्यात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की देवळाली कॅम्प लहवित रोडवरील शिवमंदिराजवळ असलेल्या गिते मळ्यात राहणार्या हिराबाई बाळकृष्ण गिते (वय ६०) या घराबाहेर बसलेल्या असताना दोन अज्ञात इसम काळ्या-निळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आले व त्यांनी हिराबाई गिते यांना “आम्ही कंपनीचे लोक असून, आमच्याजवळी पावडरने सोने चमकवून देतो,” तसेच सोन्याची घाण काढतो, असे सांगून त्यांच्या गळ्यातील एक पोत घेऊन हातात दिली व दुसरी पोत ओढून त्यात असलेली वाटी पाण्याने धुवावी लागेल, असे सांगून आम्ही पाणी घेऊन येतो, अशी बतावणी करून त्यांच्याजवळील सुमारे 45 हजार रुपयांची दोनशे मणी व दोन वाट्या असलेली एक पोत, तसेच ३० हजार रुपये किमतीची एक लहान पोत असे ७५ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. याबाबत हिराबाई गिते यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.