भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

“आई आपणही पप्पांकडे जाऊयात..” पतीच्या निधनानंतर मायलेकीने संपवलं आयुष्य : मनाला चटका लावणारी घटना

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : कोरोनाने पतीचे निधन झाल्यानंतर विरह सहन न झाल्याने आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील विनयनगर भागात राहणार्‍या एका मातेने आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना सकाळी सासरे भेटण्यासाठी आल्यावर उघडकीस आली. सुजाता यांच्या आत्महत्येनंतर घरात एक सुसाईट नोट सापडली आहे. ही सुसाईट नोट वाचून सर्वच जण गहिवरून गेले.

याबाबतची अधिक माहिती अशी, की विनयनगरमधील सुखसागर अपार्टमेंटमध्ये सुजाता प्रवीण तेजाळे (वय 36) व तिची मुलगी अनया प्रवीण तेजाळे (वय 7) या दोघी जणी राहत होत्या. प्रवीण तेजाळे यांचा मृत्यू एप्रिलमध्ये कोरोनामुळे झाला होता. प्रवीण तेजाळे यांच्या मृत्यूमुळे पत्नी व मुलगी यांना नैराश्य आले होते. त्यातून मुलगी अनन्या वडिलांची सतत आठवण काढत होती. वडिलांना भेटण्याची मागणी तिच्या आईकडे करीत होती. पतीचा कोरोनाने मृत्यू झाला, या दुःखातून सावरत असतानाच पत्नी सुजाता हिला त्यांची 7 वर्षाची चिमुरडी ही रोज आई ‘पप्पा कधी येतील” असा प्रश्न विचारत होती.



आत्महत्येपुर्वी सुजाता तेजाळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात म्हंटले आहे, “मी सुजाता प्रवीण तेजाळे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. कारण की, माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनाने गेले. तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखे आहे. आयुष्य खूप मोठं असतं पण एकट्याने राहण्यात अर्थच नाही. ना कुणाशी बोलण्याची इच्छा ना कुणाला भेटण्याची इच्छा होते. परंतु इतके दिवस फक्त मुलीसाठी कसेतरी आयुष्य काढत होते. सध्या ती खूप लहान आहे, पुढे तिचे देखील आयुष्य आहे. परंतु तिलाही पप्पांची सतत आठवण येते. पप्पा देवाघरी गेले आहे हे, मी तिला काही दिवसांपूर्वी समजावून सांगितलं, काही दिवस ती शांत राहिली. आता मात्र पुन्हा ती सतत पप्पा कधी येणार हा एकच प्रश्न मला विचारत राहते, मी पूजा केली तरीही पप्पा का येत नाही.

या तिच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ , आज सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक ती मला म्हणाली, ‘मम्मी, पप्पा नाही तर तू पण दुःखी राहते मी पण sad  राहते, आपण पप्पांकडे जाऊयात’ तिच्या या प्रश्नावर मी आज खूप विचार केला. जर पुढे मलाच काही झालं तर तिचं काय होईल? तिला सोडून जाणं शक्य नाही. आमच्या दोघींच्या आयुष्यात आता सुख नाही. आयुष्यात जगण्यासाठी पैसा सर्व काही नसतो, असं आयुष्य काढणं खूप कठीण आहे. जसा जन्म देताना त्रास झाला तसं थोडं मन घट्ट करुन हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की, आपण आता पप्पांकडे चाललो आहोत. अशी समजूत काढत आमचे आयुष्य मी आता संपवत आहे. ह्यात मी जन्म देती वैरीण नाही. ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे. बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही’

या नैराश्यातून आईनेच सात वर्षांच्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री राहत्या घरी चिमुकलीसह गळफास घेतला. सकाळी सुजाता तेजाळे यांचे सासरे त्यांन भेटण्यासाठी घरी आले होते. घराचे दार ठोठावूनही कोणी प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यानी एकाच्या मदतीने घराचे मागील दार तोडले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!