गर्लफ्रेंडच्या कारणावरून हाणामारी : तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक, प्रतिनिधी : कॉलेजमधील दोन अल्पवयीन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीत शिवाजीनगर पाझर तलावात बुडून एका अल्पवयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी दोन अल्पवयीन मुलांमध्ये जुन्या गर्लफ्रेंडच्या कारणावरून वाद होता. या वादातून काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोघांमध्ये शिवाजीनगर येथील पाझर तलावाजवळ पुन्हा हाणामारी झाली. यात एकाने दुसर्याला चापटी व ठोशाच्या बुक्क्याने मारले. ही हाणामारी सुरू असताना रस्त्यालगत असलेल्या तलावाच्या उतारावरून पाय घसरून दोघे पाण्यात पडले. पाण्यात पडल्यावरही दोघांमध्ये हातापायी झाली. यादरम्यान एक जण खोल पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर युवकांनी दोघांना बुडण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात एकाला वाचविण्यात यश आले नाही.
मयत युवकास याच उपस्थित युवकांनी हाताची साखळी करून पाण्यात उतरत वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. ही घटना समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना व गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करीत पाच अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध भा. दं. वि. कलम 304 (2), 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.