दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा; लिटरमागे 7 रुपयांनी गोडतेल स्वस्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ऐन दिवाळीत ग्राहकांना दिलासा देणारी एक मोठी बातमी. आता इंधन दराच्या पाठोपाठ गोडतेलाच्या किमतीत लिटरमागे चक्क सात रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाईला अस्मान ठेंगणे झाले आहे. इंधनदरात दिवसेंदिवस वाढ सुरू आहे. त्यापाठोपाठ सिलिंडर महागले आणि गोडतेल म्हणजेच खाद्यतेलाचे दरही विक्रमी वाढले होते. अगोदरच कोरोनाने पिचलेला सामान्य या महामागाईमुळे अजून जेरीस आला होता. मात्र, आता त्यातल्या त्यात तूर्तास दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. ऑल इंडिया एडिबल ऑइल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आयात शुल्कामध्ये कपात केली आहे. त्यामुळे प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी त्यांच्या घाऊक दरामध्ये किमान 4 ते 7 रुपयांची कपात केली आहे. खरे तर आयात शुल्क कमी झाल्यानंतर लगेच ही कपात व्हायला हवी होती. मात्र, उशिरा का होईना दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जगभरात खाद्यतेलाच्या पुरवठ्याच्या स्थितीमध्ये सुधारणा होत आहे. खाद्येतलाची टंचाई येणाऱ्या काळात जाणवली जाणार नाही. त्यामुळे गोडतेलाच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दरही घटले
केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्वीच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.