मोठी कारवाई : नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची जळगाव जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर धाड
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने जळगाव जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगारांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई केल्याने जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र एरंडोल शहरात सहा पत्त्यांचे क्लब बिनधास्तपणे सुरु असतांना केवळ एकाच क्लबवर कारवाई करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नियुक्त केलेल्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली. नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाला जळगाव जिल्ह्यात येऊन जुगार अड्ड्यावर कारवाई करावी लागत असल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जळगाव जिह्यातील एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग लगत एका हॉटेल जवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १ लाख ३१ हजार १४० रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.