अनोखी शक्कल लढवत मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणारा राज्य उत्पादन शुल्कच्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागताच्या सेलेब्रेशनसाठी मद्य विक्रेत्यांकडून अवैधरित्या मद्यसाठा घेऊन जाण्याच्या युक्त्या लढवल्या जातात. त्याचप्रमाणे एका पठ्ठ्याने चक्क संगणकाच्या सीपीयू मधून मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करण्याची शक्कल लढवली आहे. दरम्यान, विशेष भरारी पथकाने ५ लाख ३९ हजार १४० रुपयाचा मुद्देमाल या इसमाकडून ताब्यात घेतला आहे.
रविवारी (दि.२७ डिसेंबर) रोजी आंबोली घाटात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकामार्फत पांढऱ्या रंगाच्या कारची (जीजे ०५ आरजे ६२७६) तपासणी करण्यात आली. दरम्यान, कारमध्ये चोर कप्प्यात पंजाब निर्मित व फक्त दादर नगर हवेली येथेच विक्रीस परवानगी असलेली स्कॉच विदेशी दारू मिळाली. तसेच मद्याच्या बाटल्या संगणकाच्या सीपीयू मध्ये देखील आढळल्या. त्यामध्ये ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १३ बाटल्या, ब्लॅडर प्राईड व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ४ बाटल्या, व कार असा एकूण ५ लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या मनिष नानूभाई खेनी (रा.वराछा, गुजरात) याला ताब्यात घेतले आहे.