लाच भोवली : पोलिस उपनिरीक्षकासह शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नाशिक, निशाद साळवे : दुकानदार महिलेवर दाखल गुन्हात तिला जामीन मिळाल्यावर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अंबड पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री अटक केली असून मोठा अधिकारीच एसीबीच्या जाळयात अडकल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार महिलेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, पोलीस ठाण्यात जामीनप्रक्रिया पूर्ण करुन देण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) कैलास आनंदा सोनवणे (वय ५७, रा. खांडे मळा, सिडको, नाशिक) व पोलीस हवालदार दीपक बालकृष्ण वाणी (वय ३२, रा. उत्तम नगर, सिडको, नाशिक) या दोघांनी महिलेकडे मंगळवारी (दि.२३) २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती लाचेपोटी १० हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे यांनी महिलेकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. सापळ्याचा संशय येताच दोघेही लाचखोर पोलीस फरार झालेल होते. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून बुधवारी दोघांना अटक केली. दोन दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विविध तक्रारीवर कारवाई करत असून, दोन दिवसांत लाचलुचपतने तीन कारवाया करत लोकसेवकांना लाच घेताना पकडले आहे.