भरदिवसा महिलेची २ लाखांची रोकड हिसकावून चोरट्यांचा पोबारा
नाशिक, प्रतिनिधी : येथील गजबजलेल्या परिसर असलेल्या शालीमार येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधून एका महिलेंनी काढलेली २ लाखांची रक्कम दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना आज (दि. २६ ऑक्टोबर) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दिवसाढवळ्या असे लुटीचे प्रकार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत अधिक असे, शालिमार या भागात राहणाऱ्या रहेना रफिक शेख आणि त्यांचे पती रफिक सुलेमान शेख यांनी आपल्या मुलाला वाहन घेऊन देण्यासाठी आणि घर खर्चासाठी शालिमार नेहरू गार्डन जवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून 2 लाखांची रक्कम काढली होती. दुपारी 1 ते दीड वाजेच्या सुमारास ते ही रक्कम काढून घराच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघा चोरट्यांनी मागून दुचाकीवरून येऊन रहेना शेख यांच्या हातातून २ लाख रुपये रोख ठेवलेली बॅग हिसकावून शालिमारच्या दिशेने पोबारा केला. रहेना शेख व पती यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र हे चोरटे दुचाकीवर असल्याने त्यांना पकडणं शक्य झाले नाही. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दिवसेंदिवस शहरात चोरी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही की काय असाच प्रश्न आजच्या भर वस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेकडे बघितल्यावर येत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती सोबतच शहरात घडणाऱ्या चोरी,चैन स्नॅचिंग यांसह आदी गुन्ह्यांना आळा कसा बसेल असा प्रश्न आता नागरिक करत आहे. तेव्हा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अश्या वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी वेळीच योग्य ती पावले उचलावी अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकची गुन्हेगारीचं शहर म्हणून नवीन ओळख व्हायला वेळ लागणार नाही.