मित्राला बुडताना पाहून मदतीला धावला, पण नियतीने डाव साधला
नाशिक (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील मुंगसे-टाकळी शिवारातील कुरण तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
परतीच्या पावसामुळे मुंगसे-टाकळी आणि वाके या गावांजवळ असलेलं कुरण तलाव पूर्णपणे भरले आहे. काही अतंरावरच मृत तरुणाच्या कुटुंबीयांची शेती होती. रविवारी प्रसाद आणि राहुल हे दोघेही मित्र शेतात भेटले होते. त्यानंतर फिरतफिरत दोघेही जण तलावाकडे गेले. दोघे तलावाच्या किनाऱ्यावर अंघोळी करण्यासाठी उतरले. पण, एकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. पण, दोघेही जण पाण्यात बुडाले.
नजीकच असलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. ग्रामस्थांनी दोघांनां तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. राहुल राजेंद्र सागर (वय 19) व प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (वय 19, दोघे रा. मुंगसे) असं मृत झालेल्या तरुणांची नाव आहे, शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह रात्री मुंगसे गावात आणण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.