भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

नशिराबाद–जळगाव सिटी बस सेवा…. नागरिकांची व विद्यार्थी वर्गाची मागणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथून जळगाव शहरापर्यंत नियमित सिटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व विद्यार्थी व कामगार वर्गाकडून करण्यात येत आहे.
नशिराबाद शहराची वाढती लोकसंख्या, उच्च शिक्षण घेण्याकरता जळगाव ला जाणारा विद्यार्थी वर्ग-तसेच नोकरीसाठी कामगारवर्गाची दररोज होणारी दगदग आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसाठी जळगाववर अवलंबून असलेला सर्व सामान्य नागरिक यांची व्यथा लक्षात घेता ही सेवा अत्यावश्यक बनली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नशिराबाद व परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या शिक्षणासाठी दररोज जळगाव येथे प्रवास करतात. तसेच अनेक कामगार, खासगी व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी यांनाही नियमितपणे जळगावला जावे लागते. मात्र, सध्या उपलब्ध असलेली प्रवासी वाहतूक अपुरी, अनियमित व खर्चिक असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


विशेषतः सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असून महिलांनाही प्रवासात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांना दवाखान्यात ने-आण करण्यासाठीही तत्काळ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने आर्थिक व मानसिक ताण वाढत आहे.


नागरिकांचे म्हणणे आहे की, नशिराबादची वाढती लोकसंख्या आणि जळगावशी असलेले दैनंदिन व्यवहारिक नाते पाहता नियमित सिटी बस सेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा ठराविक वेळापत्रकानुसार बस फेऱ्या सुरू केल्यास विद्यार्थ्यांना, कामगारांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून या मागणीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नशिराबाद–जळगाव सिटी बस सेवा सुरू झाल्यास सुरक्षित प्रवासा बरोबरच परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!