नशिराबाद नगर परिषदेचा 150 कोटी 78 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी, डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद नगर परिषदचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 150 कोटी 78 लाख 50 हजार रुपयांचा भांडवली शिलकी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. मा. मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी हा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला.
अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन सभापती पंकज महाजन, अर्थ व नियोजन सभापती मनोज पाटील,बांधकाम सभापती विकास पाटील , महिला व बालकल्याण सभापती श्रीमती मन्यार कमरुनिसा सय्यद बिस्मिल्ला, उपसभापती श्रीमती भारताबाई धनगर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापती चेतन बऱ्हाटे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याअंतर्गत पाणी पुरवठा योजना, गटार योजना तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले.
याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत नगर परिषद हद्दीतील मृत व्यक्ती तसेच बेवारस प्रेतांच्या अंत्यविधी व दफनविधीचा संपूर्ण खर्च नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र विशेष तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प तयार करताना लेखापाल दौलत गुट्टे, लेखापरीक्षक मनोज गोरे, कार्यालय अधीक्षक आझाद पटेल तसेच संतोष रगडे उपस्थित होते. विकासाभिमुख व नागरिककेंद्री असा हा अर्थसंकल्प असल्याची भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.

