नशिराबाद नगरपरिषदेला महापुरुषांचे वावडे? प्रतिमा लावण्याच्या मागणीवरून शहरात चर्चा
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज डॉ. दीपक लोखंडे | येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद रंधे यांनी नशिराबाद नगरपरिषदेत महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याच्या मागणीवरून नगरपरिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावाव्यात, अशी मागणी त्यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती.रंधे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की,
नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत मुख्याधिकारी यांच्या दालनात या महापुरुषांचे फोटो लावलेले होते. मात्र नवीन इमारतीत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या दालनात हे फोटो नसल्याने आंबेडकरवादी समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगरपरिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महापुरुषांचे फोटो लावलेले असले तरी त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना सहज प्रवेश मिळत नसल्याने प्रमुख दालनांमध्येही या महापुरुषांच्या प्रतिमा असणे आवश्यक असल्याचे रंधे यांनी सांगितले.
या संदर्भात निवेदन देऊनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत आनंद रंधे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “नगरपरिषदेला महापुरुषांचे नेमके काय वावडे आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यानंतर आनंद रंधे व काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेत जाऊन महापुरुषांचे फोटो प्रशासनाला भेट म्हणून दिले.
तसेच महापुरुषांच्या सन्मानाबाबत होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात महापुरुषांचे फोटो तात्काळ लावावेत, अशी मागणी केली. या घटनेमुळे नशिराबाद शहरात महापुरुषांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे मत
या संदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद नशिराबाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही नागरिकांनी नगरपरिषदेला महापुरुषांचे फोटो भेट म्हणून दिले आहेत. नगरपरिषदेच्या सभागृहात महापुरुषांचे फोटो आधीपासूनच लावलेले आहेत. निवेदनकर्त्यांची मागणी प्रत्येक कॅबिनमध्ये महापुरुषांचे फोटो लावावेत अशी आहे. मात्र प्रत्येक कॅबिनमध्ये फोटो लावण्याबाबतचा निर्णय नगरपरिषदेची बॉडी पुढे घेईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.”
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

