भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

नशिराबाद मध्ये साई समर्थ कॉलनीत घाणीचे साम्राज्य ; नागरिकांचा संताप… नगरपरिषदेचे दुर्लक्ष

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | येथील प्लॉट एरिया भागातील साई समर्थ कॉलनीमधील शिवसह्याद्री अपार्टमेंट परिसरातील सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून रस्त्यावर साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवसह्याद्री अपार्टमेंट परिसरात सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. परिणामी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सदर रस्त्यालगतच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन असून सांडपाणी त्या पाइपलाइनमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी नगरपरिषदेकडे निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली आहे.

यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषदेविषयी नाराजी व्यक्त होत आहे. आरोग्य सभापती चेतन बऱ्हाटे यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच भुयारी गटाराची व्यवस्था करून प्रश्न सोडविण्यात येईल, असे तोंडी आश्वासन त्यांनी दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.

एकीकडे नगरपरिषदेचा १५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर होत असताना मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. जर लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

दरम्यान, या परिसरालगतच असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल च्या शाळकरी मुलांना तसेच श्री गजानन महाराज मंदिर येथे येणाऱ्या भाविकांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!