सर्वात मोठी बातमी : द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या नव्या राष्ट्रपती
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. या निवडणुकीत एकूण 719 खासदार आणि 9 आमदारांनी मतदान केलं होतं. यापैकी मतदान केलेल्या 9 आमदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी मिळाली होती.
द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची मतं मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मतं मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य 3 लाख 78 हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य 1 लाख 45 हजार इतकं होतं. या दरम्यान पहिल्या फेरीत 15 मतं रद्द झाली. द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीश मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण 1886 मतं वैद ठरली. त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना 1349 मतदान झालं. त्या मताचं मूल्य 483299 इतकं आहे. तर यशवंत सिन्हा यांना मतांची मुल्य ही 179876 इतकं ठरलं.
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओदिशा आणि पंजाब या राज्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण १३३३ मते वैध ठरली. यातील ८१२ मते मुर्मू यांना तर ५२१ मते सिन्हा यांना मिळाली. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ३२१९ मते वैध ठरली. या मतांचे मूल्य ८,३८,८३९ एवढे ठरले. तिसऱ्या फेरीपर्यंतच्या वैध मतापैंकी मुर्मू यांना २१६१ मते मिळाली, ज्याचे मूल्य ५,७७,७७७ एवढे आहे. तर सिन्हा यांना १०५८ मते मिळाली. या मतांचे मूल्य २६१०५२ एवढे आहे. म्हणजेच तिसऱ्या फेरीपर्यंत वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त मते मुर्मू यांना मिळाली
राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान घेण्यात आलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार असल्याचं आधीच स्पष्ट होतं. त्यानुसार आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.